चार मोटारसायकलींची चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून वेगवेगळया भागातून नुकत्याच चार दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. त्यात एका बुलेटचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ,पंचवटी,सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथर्डी फाटा परिसरातील मुन्ना ब्रिज भारद्वाज (रा.श्री आर्के ड,श्रीनाथजी कॉलनी) यांची बुलेट एमएच १५ जीसी ८९२९ गेल्या गुरूवारी (दि.८) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना रासबिहारीरोडवर घडली. कुणाल राजू शेरगिल (रा.राजमाता मंगल कार्यालयाजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेरगिल २२ जून रोजी नाशिकरोड येथे कामानिमित्त गेले होते. एमएच १५ ईव्ही ५१२४ या दुचाकीने ते आपल्या घरी परतत असतांना ही घटना घडली. श्रध्दा पेट्रोल पंपाजवळ त्यांची मोटारसायकल बंद पडल्याने त्यांनी नजीकच्या चहाच्या टपरीजवळ आपली दुचाकी पार्क केली होती. अज्ञात भामट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक रहेरे करीत आहेत. रविवार पेठेतील मोहन सदाशिव पवार (रा.गंगावाडी) शुक्रवारी (दि.७) गोदाघाट परिसरात गेले होते. यशवंतराव महाराज पटांगणात पार्क केलेली त्यांची एमएच १५ बीक्यू ०१५६ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक ठाकूर करीत आहेत. तर सिडकोतील राजरत्ननगर भागात राहणारे सचिन चंद्रकांत जाधव २२ जून रोजी कॅनडा कॉॅर्नर भागात गेले होते. क्लॉथ हाऊस शॉप समोर त्यांनी आपली डिओ मोपेड एमएच १५ जीझेड ३३५४ पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली.याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लांडे करीत आहेत.
…
बँकेत चक्कर येवून पडल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : बँकेतील रांगेत उभे असतांना चक्कर येवून पडल्याने एका ग्राहकाचा मृत्यु झाल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली. याप्रकरणी देवळीला कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अशोक दत्तात्रेय पेखळे (रा.मनपा कर्मचारी सोसा.पंचक) असे मृत बँक ग्राहकाचे नाव आहे. पेखळे सोमवारी (दि.१२) व्यापारी बँकेच्या देवळाली कॅम्प शाखेत गेले होते. कॅश काऊंटरसमोर रांगेत उभे असतांना ते अचानक चक्कर येवून जमिनीवर कोसळले. बँक व्यवस्थापनाने त्यांना तातडीने नजीकच्या पेखळे रूग्णालायात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सोपान हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार मडके करीत आहेत.