दुकानदारास त्रिकुटाकडून मारहाण
नाशिक : विकेण्ड लॉकडाऊन मुळे दुकान उघडण्यास नकार दिल्याने संतप्त त्रिकुटाने दुकान मालकास बेदम मारहाण केल्याची घटना शिंदे – पळसे येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दया पारध, सागर यादव व विक्रम शिवाजी (रा.तिघे शिंदे – पळसे ता.जि.नाशिक) अशी दुकानदारास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी रामेश्वर भाऊसाहेब पवार (रा.पळसे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार यांचे पळसे गावातील शिवाजी उद्यानाजवळ रामेश्वर फुटवेअर नावाचे चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे. रविवारी (दि.११) विकेण्ड लॉकडाऊन मुळे दुकान बंद असल्याने सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुकानाजवळ गेले असता ही घटना घडली. शिंदे गावातील पारध आणि यादव या संशयीतांनी पवार यांना गाठून चप्पल खरेदी करायची आहे असे सांगून दुकान उघडण्याचा आग्रह धरला. मात्र पवार यांनी त्यांना नकार देत उद्या येण्याचा सल्ला दिल्याने संशयीतांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. तर विक्रम नामक संशयीताने मागील भांडणाची कुरापत काढून झाडूने मारहाण करीत फरशीचा तुकडा मारून फेकला. या हाणामारीत संशयीतांनी दुकानात शिरून नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
….