मुलीची छेड काढल्याच्या कारणातून दोन गटात तुफान हाणामारी
नाशिक – पंचवटीतील वाघाडी, बुरूडवाडी येथे बुधवारी रात्री मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.
या हाणामारीच्या घटनेची तक्रार ललित दत्ता शिंगाडे (रा. बुरूडवाडी, वाघाडी) यांनी दिली असून त्यांनी धनजंय डंबाळे, अविनाश पितांबर चौरे, नितील दिलीप गांगुर्डे, दिपक दिलीप गांगुर्डे (सर्व रा. वाघाडी) यांनी शिंगाडे यांची मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने संशयितांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणात धनंजय डंबाळे (रा. वाघाडी) यांनी सुध्दा तक्रार दिली असून या तक्रारीत संशयित नरेंद्र शंकर लाखन, योगेश हिरामण बोके, रोहित दत्ता शिंगाडे, भास्कर लक्ष्मण बाके यांचे आपसात वाद सुरू असताना डंबाळे व त्याचे मित्र वाद सोडवण्यासाठी गेले असता संशयितांनी त्यांना मारहाण केली. कोयता तसेच लाठ्या काठ्यांनी मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
…….
उभ्या पोलीस वाहनास रिक्षाची धडक
नाशिक – भरधाव रिक्षाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस वाहनास धडक दिल्याने रिक्षा चालक जखमी झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी भाभानगर परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिल बशीर शेख (५२,रा. वडाळा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आप्पा पानवळ यांनी तक्रार दाखल
केली आहे. त्यानुसार मुंबई नाका पोलीस पथकाचे एमएच १५, ईए ०१५३ हे वाहन गस्त घालत असताना भाभानगर येथील वेलनेस फॉरएव्हर मेडिकल येथे रस्त्याच्या कडेला उभे असताना एमएच १५, झेड ९८६९ या क्रमांकाच्या रिक्षाने भरधाव येऊन चालकाच्या बाजुने जोराची धडक दिली. यामध्ये शासकीय वाहन तसेच रिक्षाचे नुकसान होण्याबरोबरच रिक्षा चालकही जखमी झाला. याप्रकरणी त्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.