मद्यधुंद कर्मचा-यांकडून व्यवस्थापकास मारहाण
नाशिक : कामात दिरंगाई केल्याचा जाब विचारल्याने मद्यधुंद कर्मचा-यांनी व्यवस्थापकास मारहाण केल्याची घटना केबीटी सर्कल भागात घडली. या घटनेत संशयीतांनी लॅपटॉपचे नुकसान करीत व्यवस्थापकास खुर्ची फेकून मारली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार जयेश सहादू पाटील (३३ रा.गणेशनगर,पाईप लाईन रोड) व अरविंद जंगलू शेगावकर (३८ रा.तिरंगा चौक,सातपूर) अशी व्यवस्थापकास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विशालकुमार महिंद्र शर्मा (रा.केबीटी सर्कल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा व संशयीत केबीटी सर्कल भागातील मातृछाया बिल्डींगमध्ये असलेल्या व्हिडीओकॉन या नामांकित कंपनीच्या डिश टिव्ही खरेदी विक्रीसह देखभाल दुरूस्तीचे कामकाज बघतात. संशयीत ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करीत नसल्याने शर्मा यांनी गेल्या शुक्रवारी (दि.९) दोघांना खडसावले असता ही घटना घडली. तक्रारींचे काम वेळेत करा, नाही तर काम सोडा असे सांगितल्याने संतप्त दोघांनी मद्यप्रशन करून कार्यालय गाठले. यावेळी शर्मा यांना शिवीगाळ व दमदाटी करीत टेबलावरील लॅपटॉप फोडून नुकसान केले. तसेच जातांना दोघांनी फायबरची खुर्ची मारून फेकल्याने शर्मा जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
…..