वाहन खरेदी विक्रीत एकास गंडविले
नाशिक – वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारात एकास ऑनलाईन २ लाख ६२ हजार रूपयांना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दुस-याच्या वाहनाची ओएलएक्स या सोशल साईटवर जाहिरात करून हा व्यवहार करण्यात आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत अतुल ठोंबरे (रा. दिंडोरीरोड, म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठोंबरे यांना कार खरेदी करायची होती. त्यामुळे ठोंबरे वेगवेगळया सोशल साईटवर विक्रीस उपलब्ध असलेल्या जुन्या वाहनांची जाहिरात बघत होते. ओएलएक्स या सोशल साईटवर अल्पदरातील आय १० या कारची चौकशी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. औरंगाबाद येथील लष्करातील अधिका-याचे वाहन असल्याने ठोंबरे यांनी पसंती दर्शवीत भामट्यांशी संपर्क साधला होता. यावेळी कार मालक असल्याचे भासवून भामट्यांनी कारचा व्यवहार ५० हजारात निश्चित केला. यानंतर भामट्यांनी १६ जून रोजी विविध शुल्कच्या नावाने ठोंबरे यांना रेणुकुमार आणि विकास पटेल यांच्या नावे असलेल्या गुगल पे आणि युपीआय आयडीवर २ लाख ६२ हजार १९७ रूपयांची रक्कम ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. यानंतर संबधीतांचा संपर्क तुटल्याने ठोंबरे यांनी औरंगाबाद गाठून शोध घेतला असता, लष्करी अधिका-याने आपले वाहन विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरातच टाकली नसल्याचे समोर आले. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक परोपकारी करीत आहेत.
…..
पंचवटीत महिलेची पोत खेचली
नाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना साईनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन अशोक गुंजाळ (रा.गोपाळनगर,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली आहे. सुमन गुंजाळ या सोमवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास नजीकच्या साईनगर भागात भाजीपाला खरेदी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. प्रथमेश कंम्प्युटर बोर्डा जवळून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.