पवन नगरला ८५ हजारांची घरफोडी
नाशिक : दरवाजाचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सुनीता रमेश यादव (रा. लोकमान्य नगर, पवन नगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्याने यादव यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला व ८५ हजाराची रोख रक्कम आणि सोन्याचे दागीने चोरून नेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोल्हे तपास करत आहे.
….
गळफास घेवून तिघांच्या आत्महत्या
नाशिक : वेगवेगळ्या कारणांतून गळफास घेवून शहरातील तिघांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना नेहरु नगर येथे घडली. येथील धृनिनाथ कचरू शिंदे (वय ७१) यांनी झोपडीच्या आडगईच्या लाकडाला दोरी बांधून गुरुवारी (दि. ८) गळफास घेतला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक काकड तपास करत आहे. वृंदावन नगर, म्हसरुळ येथे घडलेल्या दुस-या घटनेत प्रेरणा संदीप अहिरे हिने गुरुवारी (दि. ८) बेडरुमधील छताच्या हुकला ओढणीने गळफास घेतला. प्रेरणाचा मोबाइल बंद येत असल्याने गायत्री अहिरे ही तिला बघण्यासाठी आली असता दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते. यावेळी दरवाजा उघडून बघितले असता प्रेरणाने गळफास घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक वाघ तपास करत आहे. गांधीनगर येथे घडलेल्या तिस-या घटनेत मनोज तिजु विठनकर्म (वय ५०) यांनी राहत्या घरी लोखंडी पाइपला गळफास घेतला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
…..