नाशिक – गावठी पिस्तोल आणि तीन जीवंत काडतुसे दडवून ठेवणाऱ्या एकास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी गजाआड केले आहे. या संशयिताने त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल धृवनगर येथील ड्रेनेजमध्ये दडवून ठेवला होता. आशिष सुनिलदत्त महिरे (२४, रा. निगळपार्कसमोर, पुष्पकोटी बंगलो, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नावे आहे. महिरेकडे बेकायदेशीर पिस्तोल असल्याची माहिती युनिटचे प्रवीण वाघमारे यांना मिळाली. पोलिस निरीक्षक आंनद वाघ यांना ही माहिती दिल्यानंतर पथकाने संशयिताचे घर गाठले. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने पिस्तोल असल्याची कबुली दिली. संशयिताने हे पिस्तोल व तीन काडतुसे धृवनगरमधील मोकळ्या प्लॉटच्या बाजुला असलेल्या इलेक्ट्रीक पोल शेजारील ड्रेनेजमध्ये प्लास्टीक पिशवीत दडवून ठेवले होते. दडवून ठेवलाला हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हे हत्यार त्याने आपल्या एका मित्राकडून विकत घेतले होते. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.