महिलेचा विनयभंग एकास अटक
नाशिक : शिवीगाळ व पाठलाग करीत एकाने महिलेचे घर गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा वसाहतीत घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. जवूर शहा (रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आणि पीडित एकाच भागात राहत असून २८ जून रोजी रात्री महिला परिसरातील रस्त्याने पायी जात असतांना संशयीताने अज्ञात कारणातून शिवीगाळ केली. यावेळी महिला आपल्या घरी गेली असता त्याने पाठलाग करून तिचे घर गाठले व घरात घुसून तिचा विनयभंग केला. महिलेने वेळीच प्रतिकार करीत आरडाओरड केली असता संशयीताने तुला पाहून घेईन अशी धमकी देवून पोबारा केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलीसांनी संशयीतास अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
…..
कारखान्यातून लोखंडाची चोरी
नाशिक : कारखान्याचे गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाख रूपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशु रमेश काळे (रा.गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. काळे औद्योगीक वसाहतीतील थर्मोपॅक इंडस्ट्रीज या कारखान्याचे कामकाज बघतात. १८ ते २१ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कारखाना आवारातील गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडून गोडावून मधील लोखंडी इपीएस,एमएस क्रॉस,ए.एस.पाईप असा सुमारे ३ लाख ७१ हजार ८५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
…..