मद्याच्या नशेत मुलांना अमानुष मारहाण करणा-या बापाच्या तावडीतून दोन मुलांची सुटका
नाशिक : मद्याच्या नशेत पोटच्या मुलांना अमानुष मारहाण करणा-या बापाच्या तावडीतून दोन मुलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई नवजीवन चाईल्ड लाईन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली असून मुलांची रवानगी उंटवाडी येथील निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात निष्ठूर बापाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल दिलीप कर्डक (रा.कॅनोल रोड जेलरोड)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत बापाचे नाव आहे. कॅनोल रोडवरील गौरी कमल सोसायटी भागात राहणारा एक इसम आपल्या मुलांना अमानुष मारहाण करीत असल्याची माहिती सिडकोतील नवजीवन चाईल्ड लाईन संस्थेत मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.४) संस्थेच्या संचालकांनी पोलीसांसमवेत घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला होता. संशयीत आापल्या सात वर्षीय मुलासह चार वर्षीय मुलीस बेदम मारहाण करीत होता. याघटनेत मुलाच्या डोळयास आाणि मुलीच्या पायास गंभीर दुखापत झालेली असतांना तो अमानुष मारहाण करीत होता. पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेत मुलांची बापाच्या जाचातून सुटका केली असून त्यांची रवानगी उंटवाडी येथील निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी चाईल्ड लाईनचे विजय माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आबा मुसळे करीत आहेत.
…..