नाशिक : चोरी करीत असतांना हटकल्याने त्रिकुटाने सुरक्षा रक्षक असलेल्या दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकरोड येथील दुर्गा गार्डन भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गणेश राजेंद्र यादव (१९ रा.मोरे मळा,बालाजीनगर पंचक) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून, त्यांचा साहिल उर्फ पोशा व अन्य एक साथीदार पसार झाला आाहे. याप्रकरणी नागेंद्र भरतसिंग दीयाळ (४८ रा.नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आाहे. नागेंद्र दीयाळ आणि राकेश दीयाळ हे दोघे भाऊ दुर्गा गार्डन परिसरातील महापालिकेच्या फळ मार्केट येथे सुरक्षा रक्षक असून शुक्रवारी (दि.२) दोघे भाऊ आपली सेवा बजावत असतांना ही घटना घडली. मार्केटमधील सलीम शेख या व्यापा-याच्या गाळयातून फळांचा बॉक्स चोरी करतांना संशायीत आढळून आले असता दोघा भावांनी त्यांना हटकले. यावेळी साहिल उर्फ पोशा या संशयीताने नागेंद्र दीयाळ यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला करून जखमी केले. तर उर्वरीत दोघांनी लहान भाऊ राकेश यास लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून पोबारा केला. यावेळी टोळक्याने दोघाभावांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीसांनी एका संशायीतास बेड्या ठोकल्या असून उर्वरीत दोघांचा शोध सुरू आहे. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.