पूर्ववैमनस्यातून माडसांगवी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन जण जखमी
नाशिक : पूर्ववैमनस्यातून माडसांगवी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर माधवराव बर्वे (६८ रा.माडसांगवी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी न्यायालयातील काम आटोपून मुलासमवेत दुचाकीवर घराकडे परतत असतांना ही घटना घडली. आहिलाजी पेखळे,शाम बर्वे,शरद पेखळे,बाळासाहेब बर्वे,यशवंत बर्वे,संदिप बर्वे,भाऊसाहेब बर्वे,दत्तू बर्वे व अन्य पाच जण व तीन महिलांनी आदींनी औरंगाबाद रोडवरील चारी नंबर ७ जवळील आदिवासी वस्ती भागात कार आडवी लावून रस्ता आडविला. यावेळी संशयीतांनी कोर्टातील केस मागे घ्या या कारणातून वाद घातला. यावेळी संशयीत यशवंत बर्वे याने लोखंडी रॉड मारून जखमी केले तसेच दुचाकीचे नुकसान केले. तर श्याम पोपटराव बर्वे (४६ रा.माडसांगवी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवशक्ती नावाच्या माळावरील आपल्या दुकानात काम करीत असतांना देवकिसन उर्फ अहिलाजी पेखळे हे ग्राहक मोटार रिवायडींग करण्यासाठी आले होते. त्यांनी आपली कार दुकानासमोर लावलेली असतांना प्रबाकर बर्वे आणि मंगेश बर्वे दुचाकीवर आले. तू गाडी रस्त्यात का लावली या कारणातून कुरापत काढून बर्वे बापलेकांसह तुषार बर्वे,मंदाकिनी बर्वे तसेच योगेश पानगव्हाणे,वसंत पानगव्हाणे व अन्य पाच ते सहा जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मंगेश बर्वे याने लोखंडी गजाने मारहाण केली. तर प्रभाकर बर्वे यांनी तक्रारदाराचा चुलत भाऊ संदिप बर्वे याच्या बोटास चावा घेतला. अधिक तपास उपनिरीक्षक कपले करीत आहेत.
….
चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
नाशिक : गप्पा मारत उभ्या असलेल्या तीन मित्रांना एकाने पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करीत चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मल्हार गेट भागात घडली. पोलीसांनी संशयीतास अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद बु-हाडे (२९ रा.तेली गल्ली) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी निखील संतोष भोर (२४ रा.राजवाडा,अशोकस्तंभ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. भोर व कृष्णा सानप आणि अक्षय सानप हे तिघे मित्र रविवारी (दि.२७) रात्री मल्हारगेटवरील मोहिनी देवी स्कुल रोडवर गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. धारदार चॉपर घेवून आलेल्या संशयीताने पूर्ववैमनस्यातून तिघांना शिवीगाळ केली. तसेच चॉपरचा धाक दाखवून भोर व कृष्णा सानप या मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.