नाशिक : ऑनलाईन रौलट नावाचा जुगार खेळणा-या तीघांना पोलीसांनी अटक केली. ही कारवाई वेगवेगळया भागात करण्यात आली असून, संशयीतांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी मुंबईनाका आणि गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसिफ दस्तगीर बागवान व गणेश एकनाथ डिंडे (रा.इकबाल गल्ली भारतनगर) हे दोघे बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास इकबाल गल्लीत फनरेप नावाच्या अॅपवर आॅनलाईन रौलेट नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. स्व:ताच्या फायद्यासाठी ग्राहकांना आयडी व पासवर्ड देतांना त्यांना पकडण्यात आले असून संशयीतांच्या ताब्यातून मोबाईल आणि रोकड असा सुमारे तीन हजार ७०० रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक डंबाळे करीत आहेत. दुसरी कारवाई औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात करण्यात आली. या कारवाईत परवेझ उर्फ सोनू जावेद मनियार (१९ रा.मनपा भाजी मार्केट शिवाजीनगर) या तरूणास अटक करण्यात आली असून त्याचे लकी आहेर उर्फ भारत वसंत आहेर (रा.म्हसरूळ,दिंडोरीरोड) व विशाल आनंद नामक साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी गंगापूरचे पोलीस कर्मचारी दिपक जगताप यांनी तक्रार दाखल केली आहे. भाजी मार्केट परिसरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार बुधवारी सायंकाळच्या वेळी छापा टाकला असता परवेझ मनियार पोलीसांच्या हाती लागला. अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तो रौलट नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आला. संशयीताच्या ताब्यातून रोकडसह मोबाईल असा सुमारे १० हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.