नाशिक : शहरात सोनसाखळी ओरबाडणा-या अट्टल गुन्हेगारास पोलीसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताचा साथीदारही पोलीसांच्या हाती लागला असून दोघांच्या ताब्यातून साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केली. संशयीतांच्या अटकेने पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील सात गुन्हे उघडकीस आले असून अन्य पोलीस ठाणे हद्दीतीलही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
धनंजय महेश गायकवाड (२१ रा.काझीपुरा,जुने नाशिक) व ज्ञानेश्वर उर्फ अजय उर्फ बांड्या विजय गोसावी – गिरी (२१ रा.साईनगर,नांदूरगाव) अशी अटक केलेल्या संशयीत सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात चैनस्नॅचिंगचे प्रकार वाढले आहेत. दिवसाढवळ््या दुचाकीस्वार भामटे महिलांच्या गळ््यातील दागिणे ओरबाडून नेत असल्याने महिलावर्गात भितीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमिवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भामट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांना मध्यवर्ती शाखेचे हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या माहितीवरून संशयीत पोलीसांच्या हाती लागले आहेत.
धनंजय गायकवाड या संशयीताने आपल्या साथीदाराच्या मदतीने शहरात चैनस्नॅचिंग केल्याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मोबाईल लोकेशनच्या आधारे पुणे येथे रवाना झाले होते. पुणे शहरात संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्याने त्याचा साथीदारही हाती लागला असून दोघांनी शहरातील पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सात चैनस्नचिंग केल्याची कबुली दिली आहे. संशयीतांच्या ताब्यातून साडे चौदा तोळे सोने,दोन मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे ७ लाख ४७ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयीतांच्या अटकेने शहरातील अजून चैनस्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई उपायुक्त संजय बारकुंड,सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे,वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने,अंमलदार विजय शिरसाठ,हवालदार गंगाधर केदार,श्रीराम सपकाळ,राजेंद्र निकम,बाळू बागुल पोलीस नाईक दशरथ निंबाळकर शिपाई सचिन आजबे,विशाल वाघ आदींच्या पथकाने केली.