नाशिक : कॉलेज रोड भागातील बंगला फोडून चोरट्यांनी घरातील दहा लाखाच्या रोकडसह अलंकार असा सुमारे १२ लाख ६८ हजार रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर दत्ताराम भुसारे (रा.येवलेकर मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कॉलेजरोड भागातील येवलेकर मळय़ात संजय दशपुते यांचा शरद नावाचा बंगला आहे. या बंगल्यावर भुसारे सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. दशपुते कुटूंबिय बाहेरगावी वास्तव्यास आहेत. गुरूवारी (दि.२४) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या उत्तर भिंतीच्या पहिल्या माळयावरील लोखंडी खिडकीचे गज कापून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून दहा लाखांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १२ लाख ६८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.