नाशिक : मोकळया मैदानात फेरफटका मारीत असतांना तीन जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील खोडे मळा भागात घडली. या घटनेत संशयीतांनी डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन वायाळ त्याचे दोन साथीदार अशी संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी अनिल रामवृक्षासिंग (४५ रा.शिवशंकर चौक,सावतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अनिल रामवृक्षासिंग सोमवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास खोडे नगर येथील मोकळया मैदानात वॉकिंगसाठी गेले असता ही घटना घडली. मैदानात फेरफटका मारून ते एका जागेवर थांबून व्यायाम करीत असतांना टोळक्याने त्यांना गाठले. यावेळी संशयीतांनी अनिल यांच्याकडे मोबाईलची मागणी केली. परंतू अनिल रामवृक्षासिंग यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. मोबाईल देण्यास नकार देताच संशयीतांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी एकाने जवळ पडलेली बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात फोडल्याने अनिल रामवृक्षासिंग जखमी झाले असून, अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.