तडीपार सराईतला अटक
नाशिक – शहर पोलिसांनी दोन वर्षासाठी शहर जिल्ह्यातून हद्दपार असूनही शहरात कोयता घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले. शुभम सुभाष भामरे (वय २८, सहवासनगर) असे सराईताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सरकारवाडा, मुंबई नाका, पोलीस ठाण्यात विविध नऊ गुन्हे दाखल असल्याने त्याला पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले असतांनाही, शनिवारी (ता.२६) दुपारी अडीचला रुची हॉटेलसमोर कोयता घेउन फिरत असतांना आढळला म्हणून त्याला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई आप्पा मानसिंग पानवळ यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
…..
खिडकीतून सोनसाखळी चोरीला
नाशिक – सायखेडा मार्गावरील लोखंडे मळ्यातील पारिजातनगर येथील साई शिल्प अपार्टमेंटमधील घराच्या खिडकीतून महिलेची सोनसाखळी चोरट्याने लांबविली. याप्रकरणी सुरेखा संतोष पोरजे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोरजे यांच्या तक्रारीनुसार, २४ जूनला मध्यरात्रीतून कधीतरी चोरट्याने त्यांच्या घराची खिडकी उघडून खिडकीतून हात घालून त्यांच्या पलंगाला अटकवलेली सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली.
…..