सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स मध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केली आहे. दरम्यान, चोरी पूर्वी या चोरट्यांनी कंपनीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत डिव्हीआर व हार्डडिस्क सोबत घेऊन जात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे कंपनी परिसरात २४ तास सुरक्षारक्षक नेमलेला असताना ही धाडसी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत उज्वल भारत नावाचा कारखाना असून या कारखान्यांतर्गत एमडी ट्रेडर्सचे काम चालते. प्लास्टिक प्रिंटिंगसह पोल्ट्री व्यवसायाला लागणारे खाद्य (ट्रेडिंग) आणि ब्रॉइलर कल्ल बर्डस या कंपनी मार्फत पुरवली जाते. कंपनीचे संचालक दीपक आव्हाड नेहमीप्रमाणे कंपनीचे कामकाज उरकवून गुरुवारी रात्री आठ वाजता घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी कंपनीत गेले असता ऑफिस मधील गोदरेज कंपनीचे लॉकर व त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. यावेळी कंपनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरवलेले तर काही कॅमेऱ्यांचे कनेक्शन तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. विशेष म्हणजे ऑफिस मध्ये २ लॅपटॉप असतांना त्यांना हात न लावता तसेच कुठल्या प्रकारची तोडफोड न करता ही चोरी केल्याचे दिसून आले.
दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे यांच्यासह फिंगर प्रिंट व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या मागील बाजूतील खिडकीतून तिजोरी फेकून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस करत आहे.
….
ऑफिसमध्ये गेल्यावर कळाले
रात्री साडेसात वाजेपर्यंत कंपनीत काम सुरू होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकाला कंपनी बंद करण्याचे आदेश देत घरी गेलो. सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
-दीपक आव्हाड,
संचालक एमडी ट्रेडर्स