नाशिक : पत्नीच्या उपचारासाठी घरी आला नाही या कारणातून एकाने डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली. या घटनेत पतीच्या बचावासाठी धावून आलेल्या डॉक्टर पत्नीचा विनयभंग करण्यात आला असून,संशयीत पसार झाला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाण,विनयभंगासह वैद्यकीय सेवा अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोलसिंग परदेशी (रा.आत्मविश्वास सोसा.) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित डॉक्टर पत्नीने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संशयीत राहत असलेल्या परिसरात पीडित महिलेच्या पतीचा दवाखाना आहे. संशयीताच्या पत्नीस कंबर दुखीचा त्रास आहे. गेल्या शनिवारी पहाटेच्या सुमारास सदर महिलेस अचानक त्रास होवू लागल्याने संशयीताने डॉक्टरशी संपर्क साधत उपचारासाठी आपल्या घरी बोलावले होते. मात्र संशयीतास दारूचे व्यसन असल्याने व तो नेहमी नशेत राहत असल्याने डॉक्टरांनी अवेळी त्याच्या घरी जाणे टाळल्याने ही घटना घडली. या घटनेस दोन दिवस उलटलेले असतांना संशयीताने सोमवारी (दि.२६) डॉक्टरांना आपल्या दवाखान्याच्या पार्किंगमध्ये गाठले. यावेळी त्याने शिवीगाळ करून डॉक्टरला लाथाबुक्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या गोंगाटामुळे डॉक्टर पत्नीने आपल्या पतीच्या बचावासाठी पार्किंगमध्ये धाव घेतली असता संशयीताने त्यांचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
..