नाशिक : स्वस्तातील सोने खरेदीच्या नावाखाली एकास भामट्यांनी ७५ लाख रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी तीन आरोपींना पोलीसांनी गजाआड केले आहे. सापळा रचून गुन्हेशाखा १ ने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.
या फसवणूक प्रकरणात मदन मोतीराम साळुंके (रा. मातोरी, ता. जि.नाशिक) व संतोष विठ्ठल ढोबळे, मनेश श्रीराम पाटील ही तीन संशयीत असून यांना हा गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ईश्वर त्रिभुवन गुप्ता (४०, रा. विद्याभवन, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली होती. या तिघांनी सोने खरेदीसाठी संशयीतांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बाजारभावापेक्षा अल्पदरात सोन्याची विक्री करायची असल्याचे सांगितल्याने गुप्ता यांनी विश्वास ठेवला. सोमवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास गुप्ता बॅगेत पैसे भरून ठरलेल्या ठिकाणी गेले असता भामट्यांनी पैश्यांची बॅग घेवून पोबारा केला. शरदचंद्र पवार मार्केट मधील गाळा नं. २८ मध्ये गुप्ता यांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार गुप्ता गेले असता संशयीतांनी सोने न देता त्यांच्या ताब्यातील ७५ लाख रूपये असलेली बँग आपल्या पदरात पाडून घेत फसवणुक केली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींनी शोधण्यासाठी पथक तयार करुन त्यांना अवघ्या दोन दिवसात गजाआड केले.