देवळाली गावात जुगारी जेरबंद
नाशिक : फनरेप नावाच्या अॅपवर आॅनलाईन रौलट जुगार खेळविणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. देवळालीगावात संशयीत नागरीकांना आयडी व पासवर्ड देवून जुगार खेळण्यास भाग पाडत होते. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनेद रशिद शेख (रा.सुवर्ण हौ.सोसा.) व राजू शेख (रा.मुरली अपा.गोसावीवाडी) अशी संशयीतांची नावे आहेत. देवळाली गावातील जिजाई हॉस्पिटल भागातील सुवर्ण सोसायटीत आॅनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकला असता जुनेद शेख व त्याचा साथीदार स्व:ताच्या मोबाईलमधील फनरेप अॅपवर रौलेट जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. स्व:ताच्या फायद्यासाठी तो जुगारींना आयडी पासवर्ड देत होते. संशयीतांच्या ताब्यातून मोबाईलसह रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ११ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई सुनिल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.
…
वाढणे कॉलनीत घरफोडी
नाशिक : दिंडोरीरोडवरील वाढणे कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी संसारोपयोगी वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जयराम चौरे (रा.ग्लोरी गोल्डन पार्क,केतकीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौरे कुटूंबिय १९ ते २१ जून दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील टिव्ही,देवाच्या मुर्ती तसेच संसारोपयोगी वस्तू असा सुमारे १२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.
….