नाशिक : चाकूचा धाक दाखवून साथीदारांकरवी आपल्या मालकास लुटण्याचा प्रयत्न करणा-या नोकरास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांनी कापड खरेदी विक्री व्यवसायाच्या बोलणीसाठी दुकानदारास बोलावून घेत कारमध्ये बसवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रसंगावधान राखत मालकाने धुम ठोकल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोएब भोलू शहा (२१ रा.फकिरवाडी,नानावली) असे अटक केलेल्या नोकराचे नाव आहे. तर समिर शेख आणी मारिया नामक त्याचा साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी अमित सुरेश गाबा (रा.जनरल वैद्यनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित गाबा यांचे भद्रकाली परिसरात कापडाचे दुकान आहे. या दुकानात शहा नामक संशयीत काम करतो. शहा याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मालकास लुटण्याचा प्रयत्न केला. संशयीतांनी रविवारी (दि.२०) कापड दुकानमालक गाबा यांच्याशी संपर्क साधला होता. कापड व्यवसायाबाबत बोलायचे आहे असे म्हणून संशयीतांनी गाबा यांना सायंकाळच्या सुमारास तपोवनकडे जाणा-या मार्गावरील अमरधाम जवळ बोलावून घेतले. यावेळी आयकॉन कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना कारमध्ये बसण्यास भाग पाडले. उधारीचे पैसे आणि मालाबाबत चर्चा सुरू असतांना संशयीतांपैकी एकाने त्यांच्या पोटास चाकू लावून धमकावित मोबाईलसह गळयातील सोनसाखळी आणि अंगठीं बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाबा यांनी प्रसंगावधान राखत कारचा दरवाजा उघडून धूम ठोकली. यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी चौकशी अंती नोकरास बेड्या ठोकल्या आहेत. संशयीताने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने लुटमारीचा प्रयत्न केल्याची कबूली दिली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.