सोन्याचे अमिष दाखवून एकास ७५ लाखांना गंडविले
नाशिक : स्वस्तातील सोने खरेदीच्या नावाखाली एकास भामट्यांनी ७५ लाख रूपयाना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीतांनी पैशांनी भरलेली बॅग लांबविली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मदन मोतीराम साळुंके (रा. मातोरी, ता. जि.नाशिक) व संतोष नामक संशयीतांनी हा गंडा घातला आहे. याप्रकरणी ईश्वर त्रिभुवन गुप्ता (४०, रा. विद्याभवन, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोने खरेदीसाठी संशयीतांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बाजारभावापेक्षा अल्पदरात सोन्याची विक्री करायची असल्याचे सांगितल्याने गुप्ता यांनी विश्वास ठेवला. सोमवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास गुप्ता बॅगेत पैसे भरून ठरलेल्या ठिकाणी गेले असता भामट्यांनी पैश्यांची बॅग घेवून पोबारा केला. शरदचंद्र पवार मार्केट मधील गाळा नं. २८ मध्ये गुप्ता यांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार गुप्ता गेले असता संशयीतांनी सोने न देता त्यांच्या ताब्यातील ७५ लाख रूपये असलेली बँग आपल्या पदरात पाडून घेत फसवणुक केली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास जमादार अहिरे करीत आहेत.
….
सातपूरला पावणे तीन लाखाची घरफोडी
नाशिक : सातपूर कॉलनीतील समतानगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल पावणे तीन लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीम मोहम्मद शेख (रा.समतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे २ लाख ८३ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
…..