रेमडेसिवीर ब्लॅकने विकणारा अटकेत
नाशिक : रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयूर पितांबर सोनवणे असे संशयितचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने मखमलाबादमध्ये ही कारवाई केली. संशयिताच्या विरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात अत्यावश्यक कायदा आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणाला बाधित वडिलांच्या उपचारासाठी इंजेक्शनची गरज भासत होती. मयूर सोनवणे हा संशयित इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याने संपर्क साधला असता २० हजार रुपयाने पाच इंजेक्शन देण्याचे सांगितले. या तरुणाने गुन्हे शाखा युनिट २ चे बाळा नांद्रे यांना ही माहिती दिली. पथकाने तत्काळ कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार मखमलाबाद गावात संशयिताला सापळा रचून ताब्यात घेतले. संशयिताकडून ५ रेमडेसिवीर, स्कूटर, मोबाइल, दोन हजारांची रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांनी फिर्याद दिली.
……
बालविवाह लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याप्रकरणी पाच जणांसह नातेवाईकांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी चांदवड पोलिसांनी समज दिलेली असताना देखील हा विवाह करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवार (दि. २०) एप्रिल रोजी झालेल्या या विवाह प्रकरणी एका महिलेने सातपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजू उर्फ राजेंद्र बाळू कुऱ्हाडे, बायजाबाई राजेंद्र कुऱ्हाडे, अविनाश प्रभाकर काळे, प्रभाकर काळे, उषाबाई प्रभाकर काळे व त्यांचे इतर नातेवाईक या प्रकरणात संशयित आहेत. संबधित विवाह सोहळ्यातील वधू ही अल्पवीन असल्याचे संशयितांना माहिती होते. सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
……….
वीजचाेरावर गुन्हा
नाशिक : वीज वितरण कंपनीच्या वाहिनीवर आकडा टाकून विज चोरी करणाऱ्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम रामचंद्र काळे (रा. द्वारका सर्कल) असे संशयिताचे नाव आहे. तेजसकुमार सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली. संशयित काळे याचा विज पुरवठा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने खंडीत केलेला होता. असे असताना त्याने कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विजेचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार शेख तपास करत आहेत.
………
गॅलरीतून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
नाशिक : खेळता खेळता गॅलरीतून पडून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर येथे शुक्रवारी (दि. २३) घडली. प्रांजल दिनेश पाटील असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही चिमुकली खेळत असताना गॅलरीतून खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी तिला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज महाविद्यालयात दाखल केले असता डॉ. सुरवसे यांनी तपासून मयत घोषित केले.
……..
राॅटविलरने घेतला चावा
नाशिक : कुत्रा चावल्याने मालकाविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव गवळी (७३, रा. भाभानगर) यांनी फिर्याद दिली असून सूरज वसंतराव साळुंके (५२), इशांत साळुंके (२१, दोेघे रा. भाभानगर) अशी संशयितांची नावे आहेत. (दि. १९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ज्ञानदेव गवळी हे त्यांच्या घराजवळ होते. यावेळी संशयितांनी पाळलेला रॉटविलर जातीचा रेक्स नावाचा कुत्रा मोकळा फिरत होता. हा कुत्रा गवळी यांच्याजवळ आला व डाव्या पायाला आणि डाव्या दंडाला चावा घेतला. कुत्रा चावत असल्याचे पाहून देखील संशयितांनी त्यास हटकले नाही. हवालदार आहिरे तपास करत आहेत.