नाशिक : लाल मिरची खरेदीच्या बहाण्याने कोल्हापूर येथील व्यापा-यास तब्बल पंधरा लाख रुपये तर इंडिया मार्ट ऍपद्वारे संपर्क करून १२ टन आले खरेदीची तयारी दाखवून कर्नाटकच्या व्यापा-यास ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा घालणा-या मोहसिन अकिल शेख ( २९,रा.शिवाजीनगर, सातपूर) अबरार महेबुब बागवाण (२७, रा.बागवानपुरा, जुने नाशिक ) या दोघांना पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या दोन्ही लबाडाकडून पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील दोन मोटारी व २ लाख २० हजार रुपये रोकड असा ६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोल्हापूरच्या मिरची खरेदी याप्रकरणी संदिप रावसाहेब पाटील (रा.शिरोळ जि.कोल्हापूर) या मिरची व्यापा-याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, शेतमालाचा व्यापारी असल्याचे भासवून संशयीतांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. २० फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान मिरची खरेदीच्या मोबदल्यात १५ लाख रूपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. माल ताब्यात मिळताच पैसे देण्याची बोली असल्याने पाटील यांनी टेम्पो भरून मिरची पाठविली होती. पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इन पाठीमागील भागात कोल्हापूरहून आलेला टेम्पो पोहचताच संशयीतांनी तो दुस-या टेम्पोत खाली करून घेतला. यावेळी पाटील यांना लवकरच पैसे देतो असे सांगून संशयीतांनी धनादेश दिला. मात्र तीन चार महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने पाटील यांनी धनादेश बँकेत वटण्यासाठी टाकला असता तो वटला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी पोलीसात धाव घेतली.
तर आले खरेदी प्रकरणात कर्नाटकच्या व्यापा-यास ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा घातला. याप्रकरणी तोफिक अन्सल फयाज अहमद (रा. दारू दमण स्ट्रीट, चिखमगंलूर, कर्नाटक) यांनी तक्रार दाखल केली होती. इंडिया मार्ट या ऍपद्वारे संशयिताने तोफिक यांच्याशी १ जुन रोजी संपर्क साधला होता. त्यावेळी नाशिक येथे आले आद्रकचा चांगला भाव आहे. किलामागे १ रूपया कमिशन घेऊन तुम्हाला चांगले पैसे मिळवून देतो असे सांगून १२ टन आले आणण्यास सांगीतले. त्या प्रमाणे तोफिक यांनी ४ लाख २० हजार रूपयांचा २०४ गोण्या (१२ टन) आले घेऊन ते नाशिक येथे आले होते. संशयितांनी अंबड परिसरातील हॉटेल स्कॉंयलार्क येथे आयशर व पिकअप मधून आले लोड करून संशयित घेऊन गेले. त्यांनी आल्याची परस्पर विक्री केली. तसेच जातना तोफिक यांना १० हजार रूपये व ट्रकचे ४० हजाराचे भाडे देऊन उर्वरीत ३ लाख ७० हजार रूपयांची फसवणूक केली होती.
असे अडकले आरोपी
हे दोन्ही आरोपी पंचवटी येथील व्यापा-यास उरलेली रक्कम परत देण्यासाठी कारमधून आले होते. त्यानंतर तपास अधिकारी राकेश शेवाळे, रवी पानसरे, चंद्रकांत गवळी, हेमंत आहेर यांनी या दोघांच्या मुसक्या बांधल्या.
असा केला तपास
अंबड पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी,श्रीकांत निंबाळकर यांनी स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाने वडाळाभागातील संशयिताच्या पत्त्यावर चौकशी केली. तेथे बनावट पत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर आले ज्या वाहनातून लांबवले त्यांची आरटीओतून नोंदणी क्रमांकावरुन पोलीसांनी तपासात दिली.