नाशिक – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस.एस.नायर यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०१६ मध्ये पंचवटीतील काकडबाग भागात घडली होती. गजानन मदन झरे (२२ रा.मोरे मळा,काकडमळा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी २० मे २०१६ रोजी रात्री परिसरातील सार्वजनिक शौचालयात जात असतांना ही घटना घडली होती. पाठीमागून आलेल्या आरोपीने तिचे तोंड दाबून नजीकच असलेल्या आपल्या बहिणीच्या खोलीत ओढून नेले होते. याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मात्र मुलीने प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने आरोपीने तिची सुटका केली होती.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गु्न्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक एच.एन.देवरे यांनी केला. या खटल्यात सरकार तर्फे अॅड. दिपशिखा भिडे आणि अॅड.योगेश कापसे यांनी बाजू मांडली. पोलीस हवालदार एम.एम.पिंगळे आणि पोलीस नाईक एस.एल.जगताप यांनी खटल्याचा पाठपुरावा केला. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस पोस्को कायद्यान्वये दहा वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.