अशोकनगरला ७७ हजाराची घरफोडी
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७७ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह शिलाई मशीनचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलाकर वाल्मिक बाविस्कर (रा.सिताई सोसा.जाधव संकूल) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाविस्कर कुटूंबिय बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी ही संधी साधली. बुधवारी (दि.१६) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून हॉलमधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिणे व शिलाई मशिन असा सुमारे ७७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
….
शहरात तिघांची आत्महत्या
नाशिक : शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरूवारी (दि.१७) वेगवेगळय़ा भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन तरूणींसह एकाचा समावेश असून त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात मृत्युच्या वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पाथर्डी गावातील शिवाजी चौक भागात राहणा-या आकांक्षा सुभाष बोडके (२०) या तरूणीने दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. याबाबत उमेश गोडसे यांनी खबंर दिल्याने मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना चार्वाक चौक भागात घडली. कुणाल सतिष पाटील (३२ रा.जिल्हा परिषद कॉलनी) यांनी आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.मृताच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास जमादार हादगे करीत आहेत. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. खुटवड नगर भागात राहणा-या साक्षी अमित शिंदे (२३ रा.श्रीजी अपा.विघ्नहर कॉलनी) यांनी अज्ञात कारणातून आपल्या घरात छताच्या पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.
………