लहान मुलास मारहाण एकास अटक
नाशिक : भांडण पाहण्यास थांबलेल्या सातवर्षीय बालकास मारहाण केल्याप्रकरणी पोलीसांनी एकास बेड्या ठोकल्या आहे. ही घटना वडाळानाका भागात घडली असून,याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रमेश सकट (रा.नागसेननगर,वडाळानाका) असे मुलास मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. या घटनेत चैतन्य रविंद्र जाधव हा बालक जखमी झाला आहे. याप्रकरणी सोनाली कालीदास गांगुर्डे (रा.शर्मा गॅरेज मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. चैतन्य बुधवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास दुकानात जात असतांना ही घटना घडली. दुकानात तो जात असतांना संशयीताचे आई वडिल आपल्या घरात जोरजोरात भांडण करीत असल्याने चैतन्य जाधव हा रस्त्यात उभा राहून दांम्पत्याची भांडण बघत होता. यावेळी घरातून बाहेर आलेल्या संशयीताने तू इथे कशाला थांबला असे म्हणून त्यास मारहाण केली. या घटनेत बालकास दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
….
आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील सर्व्हीस रोडवर झाला. या अपघातात मृत चालकाचा मित्र जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरसिंग वळवी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, मगन राण्या वळवी (२४ रा.दत्तनगर,अंबड) हा युवक जखमी झाला आहे. जखमीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे मित्र बुधवारी (दि.१६) सायंकाळी पल्सर (एमएच १५ डीए ९८९५) दुचाकीवर बॉटनिकल गार्डन येथे फिरण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला. महामार्गावरील पांडवलेणी परिसरातून ते बॉटनिकल गार्डच्या दिशेने डबलसिट सर्व्हीस रोडने प्रवास करीत असतांना समोरून भरधाव येणाºया अज्ञात आयशर ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात विरसिंग वळवी याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. तर मगन वळवी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.