इलेक्ट्रीक शॉक लागून कामगाराचा मृत्यु
नाशिक :सुशोभिकरण करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना रामवाडी भागातील गोदापार्क परिसरात घडली असून या घटनेने स्मार्ट सिटी कामाने पहिला बळी घेतल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुनिल राधाकिसन नागरे (४७ रा.सिन्नर जि.नाशिक) असे मृत कामगाराचे नाव आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. सध्या रामवाडी आणि गोदापार्क भागात रात्रंदिवस काम सुरू आहे. नागरे हा कामगार मंगळवारी (दि.१५) रात्री या ठिकाणी काम करीत असतांना ही घटना घडली. गोदापार्क नजीकच्या शौचालया जवळ दिशादर्शक फलकाजवळ काम करीत असतांना नजीकच्या इलेक्ट्रीक पोल मधून विजप्रवाह जमिनीत उतरल्याने ही घटना घडली. इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने नागरे दूरवर फेकले गेले होते. ही बाब लक्षात येताच अन्य कामगारांनी या भागातील वीज पुरवठा खंडीत करून नागरे यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक दीपक नाईक करीत आहेत.
….
सायकलसह मोपेड चोरी
नाशिक : शहरात वाहन आणि सायकल चोरीची मालिका सुरू असून सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली मोपेड दुचाकीसह सायकल चोरट्यांनी चोरून नेली. विशेष म्हणजे एकाच इमारतीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामदास चव्हाण (रा.ऐश्वर्या रेसि.पांडवनगरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांची मोपेड दुचाकी (एमएच १५ जीक्यू २२३३) रविवारी (दि.१३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याचवेळी चोरट्यांनी सोसायटी सदस्य राकेश जैसवाल यांच्या सायकलीवरही डल्ला मारला असून अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.