नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिव दमन या केंद्र शासित प्रदेशात निर्मीत दारूची राजरोस बेकायदा वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईत दोघांच्या मुसक्या आवळत पथकाने पिकअप वाहनासह तब्बल १५ लाख ३९ हजाराचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई जव्हार रोडवरील अंबोली घाटात करण्यात आली. हा मद्यसाठा धुळे जिल्ह्यात पोहच करण्यात येणार होता. याप्रकरणी दोघां संशयितांसह पुरवठादार व अज्ञात खरेदीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर संतोष पाटील(२५ मुळ रा. नंदूरबार हल्ली सुरत,गुजरात) व पराग दिनानाथ पाटील (२३ रा.सुरत) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दीव दमण येथील मद्याचा धुळे येथे पुरवठा होणार असल्याची माहिती विभागीय भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.५) पहाटे जव्हार त्र्यबंकरोडवर पथकाने सापळा लावला होता. अंबोली घाटातील भांगे बाबा मंदिराजवळ पथकाने एमएच १९ बीएम २४०४ ही भरधाव मालवाहू पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता त्यात दीवदमन निर्मीत व राज्यात विक्रीस बंदी असलेला विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
पथकाने चालक व क्लिनरला बेड्या ठोकत वाहनासह सुमारे १५ लाख ३९ हजार २०० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला असून अधिक तपास दुय्यम निरीक्षक किरण धिंदळे करीत आहेत. ही कारवाई विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.एम.गौडा, दुय्यम निरीक्षक किरण धिंदळे,प्रविण मंडलिक,डी.बी.कोळपे, सहाय्ययक दुय्यम निरीक्षक के.एस.गांगुर्डे जवान महेश सातपूते,युवराज रतवेकर,विलास कुवर,राहूल पवार,धनराज पवार सुनिता महाजन आदींच्या पथकाने केली.