नाशिक – आई हॅास्पिटमध्ये असून तिच्या उपचारासाठी पैसे हवेत असे सांगून एका भामट्याने नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह पार्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, यांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्याचे मुकेश राठोड असे नाव असून त्याने त्याची आई पुण्याच्या बाणेर मधील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तिला उपचारासाठी पैसे लागत असल्याचे भासवले. त्यानंतर या महिला आमदारांनीही मदत म्हणून रक्कम ऑनलाइनव्दारे दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिला आमदारांनी सायबरला अगोदर तक्रार दिली. मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.