देहविक्री करणा-या महिलेकडून ग्राहकास मारहाण
नाशिक : ग्राहकाच्या ताब्यातील पैसे पदरात पाडून घेत देहविक्री करणा-या महिलेने आपल्या साथीदारांकरवी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना मालेगाव स्टॅण्डवरील इंद्रकुंड भागात घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून पोलीसांनी संशयीतांपैकी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी पाथरे,यश ललवाणी,सनी पाथरे व चंदन नागराणी अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून महिला अद्याप फरार आहे. याप्रकरणी वाल्मिक दादाराव आहिरे (२५ मुळ रा. खंडाळा ता.श्रीरामपूर हल्ली कोनार्कनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जखमी आहिरे यास मित्राने सदर महिलेचा नंबर दिला होता. त्यानुसार त्याने महिलेच्या मोबाईलवर मॅसेज केला असता ही घटना घडली. महिलेने बुधवारी (दि.१६) इंद्रकुंड भागात तरूणास बोलावले. यावेळी तरूणाकडून पंधराशे रूपये महिलेने स्विकारण्यात आले. पैसे पदरात पडताच महिलेने थोड्या वेळात हॉटेलवर जावू असे सांगून संशयीत टोळक्यास बोलावून घेतले. एमएच १५ सीडी २९७६ या आयटेन कार मधून आलेल्या टोळक्याने तरूणास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी एकाने वाहनात ठेवलेला लाकडी दांडके काढून आणीत मारहाण केल्याने तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलीसांनी संशयीतांना जेरबंद केले असून मुळ सुत्रधार महिला अद्याप फरार आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एस.बी.चोपडे करीत आहेत.
……
हिरावाडीत महिलेचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : भाजीपाला खरेदीकरून घराकडे पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना हिरावाडी रोड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून भामट्यांचा शोध घेत आहेत. कांचन कांतीलाल भंडारी (६२ रा. दामोदार रोड,हिरावाडीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भंडारी या बुधवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास हिरावाडी रोड भागात भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. एकनाथ रेसिडन्सी समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे दीड लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.