नाशिक : न्यायालयाच्या आदेशाने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प भागात महिलेचा विनयभंग करुन पीडितेच्या मुलास धमकावीत त्रिकुटाने तिच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र न्याय न मिळाल्याने तिने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने विनयभंगासह विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी पीडितेला शेजा-याने शिवीगाळ करीत घरात घुसून विनयभंग केला. यावेळी पीडितेचा मुलगा संशयितास समजवून सांगण्यास गेला असता त्यासही संशयिताने शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने त्याने महिलेच्या चार चाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी महिलेने पोलिसात दाद मागितली होती.