नाशिक : शनिचौकात शनिमंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ हजाराहून अधिक नाणी (चिल्लर) व नोटा चोरुन नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार अविनाश जानोरकर (रा.स्नेहनगर,म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जानोरकर शनि चौकातील श्री शनिमंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. गुरूवारी रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली. मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटीचे लोखंडी कुलूप तोडून त्यातील नोटा व नाणी अशी सुमारे २५ हजाराहून अधिक रोकड चोरून नेली. ही घटना दुस-या दिवशी उघडकीस आली. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.