नाशिक – लोखंडी ढापे चोरणा-या चोरट्यासह दोघा भंगार व्यावसायीकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून अॅटोरिक्षासह ढापे असा सुमारे १ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे. आडगाव शिवारातील डीमार्टच्या आवारातील लोखंडी ढापे चोरीला गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नितीन सुखदेव बागुल (२८ रा.सिध्दार्थ नगर,एकलहरा),नाझीम रशीद खान (२५ रा.भगवती लॉन्स मोरेमळा,जेलरोड) व अफजल सलीम पठाण (३४ रा.इंदिरागांधी झोपडपट्टी,कॅनोलरोड जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून नितीन भिमा अहिरे (रा.पगारे मळा,उपनगर) हा त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे.
डी मार्टच्या आवारातून चोरट्यांनी १५ जून रोजी २५ हजार रूपये किमतीचे लोखंडी ढापे चोरून नेले होते. यानंतर वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कामाला लागली होती. उपनिरीक्षक जाकीर शेख यांच्या पथकाने नारायण बापू नगर भागात अॅटोरिक्षा शोधून काढली. त्यानंतर चालक नितीन बागुल पकडल्यानंतर या चोरीचा उलगडा झाला. संशयिताने नितीन भिमा अहिरे (रा.पगारे मळा,उपनगर) या साथीदाराच्या मदतीने चोरी करून ढापे भंगार व्यावसायीक नाझीम खान व अफजल पठाण यांना विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दोघा भंगार व्यावसायीकांना ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक जाकिर शेख,अंमलदार काळू बेंडकुळे,अनिल दिघोळे,येवाजी महाले,सुरेश माळोदे,शरद सोनवणे,आसिफ तांबोळी,संदिप भांड,रामदास भडांगे,रावजी मगर,मुक्तार शेख व आण्णासाहेर गुंजाळ आदींच्या पथकाने केली.