क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ९० हजाराला ऑनलाईन गंडा
नाशिक : क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवित त्यांना ९० हजार ३३८ रूपयांना परस्पर ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. रविकांत कमलाकर काळे (रा.मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे गेल्या महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. २२ मे रोजी परतीच्या प्रवासासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात जाण्यासाठी ते त्र्यंबक येथून नाशिकरोड बस मध्ये प्रवास करीत असतांना ही घटना घडली. वीज बिल भरणा केला नसल्याबाबत काळे यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने त्यांनी ६२९५८४१२२८ या मोबाईल धारकाशी संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. संबधिताने दिपक शर्मा असे नाव सांगून काळे यांना टिम व्हिवर क्विक सपोर्ट हे अॅप डाऊन लोड करण्यास सांगून ते अॅक्टीव्हेट करण्यासाठी दहा रूपये वीज बिल भरण्यास भाग पाडले. काळे यांनी एसबीआय बँकेच्या क्रेडीट कार्डवरून हे बिल अदा केले असता भामट्यांनी क्रेडिट कार्डच्या गोपनिय माहिती मिळवित त्यांना ९० हजार ३३८ रूपयांना परस्पर ऑनलाईन गंडा घातला. ही बाब निदर्शनास येताच काळे यांनी मुंबईनाका पोलिसात धाव घेतली असून निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.
वृध्द महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले
नाशिक : नाशिकरोड येथील मुक्तीधाम परिसरात देवदर्शनासाठी मंदिरात गेलेल्या वृध्द महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले. लहानबाई विश्राम चत्तर (६९ रा.जगतापमळा,ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चत्तर या वृध्दा बुधवारी दुपारी मुक्तीधाम येथे गेल्या होत्या. मंदिरात देवदर्शन घेवून गर्दीतून त्या बाहेर पडत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३६ हजार रूपये किमतीचे मिनी गठण हातोहात लांबविले. अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.