डांबर गोळया खाऊन ३१ वर्षीय तरूणाने केली आत्महत्या
नाशिक : गंजमाळ भागात डांबर गोळया खाऊन ३१ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असून या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंडीत बुधा गवे (रा.भिमवाडी,सहकारनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गवे याने गुरूवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून डांबर गोळय़ा खाल्या होत्या. ही बाब निदर्शनास येताच बहिण लता सुर्यवंशी यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. सहाय्यक उपनिरीक्षक सतिश जाधव यांच्या खबरीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक रायते करीत आहेत.
घरात घुसून दोन मोबाईल चोरून नेल्याच्या घटना
नाशिक : औद्योगीक वसाहतीत मंगळवारी (दि.१४) वेगवेगळया ठिकाणी चोरट्यांनी घरात घुसून दोन मोबाईल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी अबंड पोलिस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना दत्तनगर भागात घडली. याप्रकरणी कांतीलाल रघुनाथ निकुळे (रा.दत्तनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. निकुळे कुटूंबिय घरात असतांना भामट्यांनी उघड्या घरात शिरून मोबाईल चोरून नेला. तर दुस-या चोरीची राजन विकास गांगुर्डे (रा.नवनाथनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे परिवार मंगळवारी आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. दोन्ही घटनात सुमारे १८ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरीस गेले असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.