नाशिक – सहा दिवसापूर्वी नाव दरवाजा येथील योगगुरू किर्तीकुमार औरंगाबादकर यांच्या तीन मजली वाड्याचे पत्रे उचकटून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड आणि संसारोपयोगी वस्तू असा सुमारे ९ लाख ८१ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या चोरी प्रकरणी पोलीसांनी इमारतीच्या छताचा पत्रा उचकटून घरफोडी करणा-या दोघा चोरट्यांसह चोरीचे सोने खरेदी करणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या घरफोडीच्या गुह्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व संशयीतांच्या ताब्यातून सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या चोरी प्रकरणी निखील संजय पवार (२० रा.समर्थ ड्रिम,त्रिकोणी बंगला हिरावाडी),योगेश चंद्रकांत साळी (२० रा.देवी मंदिराजवळ,शिवाजी चौक लेखानगर),राजेंद्र अशोक अहिरराव (४१ रा.जठारवाडा,म्हसरूळटेक),यशवंत उर्फ दौलत शंकर सोनवणे (२५ रा.जंत्रे वाडा,डिंगरअळी) व अमोल किसन राजधर (३६ रा.हुंडीवाला लेन,दहिपुल) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहे. यातील अहिरराव,सोनवणे आणि राजधर यांनी या गुह्यातील चोरीचे सोने खरेदी केल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. ही घटना १० जून रोजी उघडकीस आली होती.
याप्रकरणी औरंगाबादकर यांचे भाचे मंदार वडगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांना भद्रकाली आणि पंचवटी पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. हिरावाडीतील निखील पवार व त्याच्या साथीदारांनी ही घरफोडीची माहिती मिळाल्याने पोलीसांनी योगेश साळीसह दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पवार याच्या ताब्यातून रोकडसह सोन्याचांदीचे अलंकार असा सुमारे २ लाख १४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान पवार आणि साळी पोलीस कोठडीत असून त्यांनी दिलेल्या माहितीवरून चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी उवर्रीत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून ५ लाख १९ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई उपायुक्त विजय खरात,सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार,सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,हवालदार बी. एन. जाधव, युवराज पाटील,पोलीस नाईक आर. बी. कोळी, एम. एम. शेख, के. एम. सैय्यद,एस. बी. म्हसदे, एम. एस. सैय्यद,एस. पी. निकुंभ, जी. एल. सांळुके,एस. एम. पोटीदे व पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,अंमलदार राजेश राठोड व कुणाल पचलौरे आदींच्या पथकाने केली.