नाशिक : सराफ बाजारात बंगाली कारागिराने तब्बल पावणे तीन लाख रूपये किमतीचे दागिणे घेवून पोबारा केल्याची घटना घडली. हिरा पात्रा (४० रा.मोहिसडल मेदिनापूर,प.बंगाली) असे पसार झालेल्या संशयित कारागिराचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य सहकारी दुकानाबाहेर गेल्याची संधी साधत भामट्याने हा डल्ला मारला आहे. याप्रकरणी प्रसाद रमेश बाबर ( रा. दहिपूल ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाबर यांचा सराफ बाजारातील पगडबंद लेन येथे सराफी दुकान आहे. तर परिसरातील गजानन कॉम्प्लेक्सच्या दुस-या मजल्यावर दागिणे घडविण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली आहे. संशयित व अन्य एक कारागिर या ठिकाणी दागिणे घडवितात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोघांपैकी एक कारागिर दुकानाबाहेर पडला असता मशिन ऑपरेटर असलेल्या संशयिताने टेबलाच्या ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्याच्या धातूचा तुकडा, तयार अंगठी,मुरन्या,बांगड्या असा सुमारे २ लाख ८५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. संशयित परत न आल्याने ही घटना उघडकीस आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत.