शिवनगर भागात दुचाकीवरून पडल्याने १८ वर्षीय युवकाचा मृत्यू
नाशिक : शिवनगर भागात दुचाकीवरून पडल्याने १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋषीकेश अनिल गरड (रा.निलगीरीबाग,औरंगाबादरोड) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गरड सोमवारी शिवनगर येथील डाळींब मार्केटमध्ये गेला होता. रात्री दुचाकीवर घराकडे परतत असतांना ही घटना घडली होती. दुचाकीवर प्रवास करीत असतांना अचानक तो पडला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेडिकल कॉलेजचे डॉ.शरद पाटील यांनी खबर दिल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू
नाशिक : गेली तीन महिने जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देणा-या मनिषा घोलप (२६) यांचे निधन झाले आहे. स्वयंपाक करीत असतांना स्टोव्हचा भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळेनगर रामवाडी येथे मनिषा प्रकाश घोलप राहत होत्या. घोलप या १९ एप्रिल रोजी आपल्या घरात स्टोव्हवर स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक स्टोव्हचा भडका उडाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. बहिण दिपाली सैनिक यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. गेली तिन महिने त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.