नाशिक : वडाळा गावात इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मजूर पुरविणा-या ठेकदाराविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर रघुनाथ शिंदे (रा. दत्तमंदिररोड,ना.रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठेकेदाराचे नाव आहे. वडाळागावातील गरिब नवाज कॉलनीत २६ मे रोजी ही घटना घडली होती. किस्कू उर्फ बबलू मुरमू ठाकूर (५४ मुळ रा.बागनवारी,प.बंगाल) हा कामगार व्हिस्टा सोसायटी पाठीमागील आय.एन.डी.डेव्हलपर्सच्या नव्याने सुरू असलेल्या सिग्नीफिंकट या इमारतीच्या बांधकामावर काम करीत असतांना हा अपघात झाला होता. ठाकूर सातव्या मजल्यावर काम करीत असतांना तोल गेल्याने जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याने कामगाराचा बळी गेला आहे. याप्रकरणी हवालदार किशोर खरोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदोष मनुष्ट वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.