नाशिक : भरदिवसा टेरेसच्या दरवाजातून घरात प्रवेश करुन चोरट्यांनी रोकडसह, मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. शिखरेवाडी ग्राऊंड भागात ही घटना घडली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन भगवान उन्हवणे (रा.अमर हौ.सोसा.शिखरेवाडी ग्राऊंड समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उन्हवणे कुटुंबिय मंगळवारी (दि.१४) घरात असतांना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅटच्या टेरेसच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. यावेळी भामट्यांनी बेडरूममधील कपाटातून ५ हजाराची रोकड दोन मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ४६ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिंडोरी रोडवरील स्नेहनगर भागात घडली आहे. प्रविण दिनकर गांगुर्डे (रा.पंचरत्न सोसा.साई मंदिरामागे,स्नेहनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. गांगुर्डे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रविण गांगुर्डे यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार राऊत करीत आहेत.