नाशिक : गंगापूर गावात हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. सावन हिरामण भसरे (२४, रा. शंकरनगर, तवलीफाटा, पेठरोड) असे अटक केलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भसरे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी तो गंगापूर गावात असल्याची माहिती खब-याने युनिट १ च्या पथकास दिली. पथकाने बसथांबा भागात सापळा रचून त्यास जेरबंद केले असून याप्रकरणी अंमलदार मुख्तार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.