भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय वृध्द ठार
नाशिक : वडाळानाका भागात रस्ता ओलांडत असतांना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना घडली आहे. नसीम वाहीद शेख (रा.नाईकवाडीपुरा,अजमेरी मस्जिद जवळ) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख शुक्रवारी वडाळानाका परिसरातील सुदर्शन हॉस्पिटल समोरून पायी जात असतांना हा अपघात झाला होता. रस्ता ओलांडत असतांना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मुलगा नेहाल याने त्यांना तातडीने धाडीवाल रूग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ४१ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शिंगवे बहुला येथे घडली आहे. सुभाष लक्ष्मण भालेराव (रा.सोनेवाडी,धोंडीरोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भालेराव यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. भालेराव यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.सी.डी.बावसकर यांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.