जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल चोरीला
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या दुचाकीच्या डिक्कीत ५० हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र होती. संतप राजाराम धोंगडे (रा.गंगाव-हे,गोवर्धन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंगडे गुरूवारी (दि.९) कामानिमित्त जिल्हा न्यायालयात गेले होते. कोर्ट आवारातील मारूती मंदिर भागात त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ एफझेड ६०५८ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली. या दुचाकीच्या डिक्कीत ५० हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र होते. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
घरात शिरून चोरी
नाशिक : फुलेनगर येथे घरात शिरून चोरट्यांनी दोन मोबाईल आणि रोकड असलेले पाकिट लंपास केले आहे. या घटनेत १६ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता विजय कस्तुरे (रा.गजानन चौक,सम्राटनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कस्तुरे बुधवारी (दि.८) आपल्या घरकामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून टेबलावर ठेवेले दोन मोबाईल आणि पाकिट असा सुमारे १६ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पाकिटात १ हजार २०० रूपये होते. अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.