नाशिक – नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉ. ओंकार पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्यात डॅाक्टरांच्या हाताला जखम झाली आहे. या हल्लेखोरांनी डॅाक्टरांच्या खिश्यातील रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाटील यांच्याकडून हल्लेखोर व त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकींचे वर्णन जाणून घेत तत्काळ वायरलेस यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला.
डॉ. पाटील हे मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवर चौघे हल्लेखोर आले. त्यांनी डॅाक्टरांच्या हातातील मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका हल्लेखोराने कोयता काढून त्यांच्या हातावर वार केला. इतर तिघा हल्लेखोरांनी त्यांचे हात धरून ठेवत खिशात असलेली तीन ते साडेतीन हजारांची रक्कम काढून घेतली. यानंतर डॉक्टरांनी आरडओरड करताच रुग्णालयातील कर्मचारी धावत आले. मात्र, तितक्यात हल्लेखोर दुचाकींवरून पळून गेले.