नाशिक : विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूस अटक करण्यात आली आहे. घर बांधण्यासह व्यवसायासाठी माहेरून हुंड्यातील एक लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करण्यात आला. त्यामुळे तीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या आईने केली आहे. या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक कांतीलाल देवकर, अनिता कांतीलाल देवकर व संतोष कांतीलाल देवकर (रा.सर्व कांबळे गल्ली,निसर्गनगर नांदूरनाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून अभिषेक देवकर व अनिता देवकर या मायलेकास अटक करण्यात आली आहे. सोनाली अभिषेक देवकर (२२) या विवाहितेने मंगळवारी (दि.७) आपल्या शेतातील घराच्या लोखंडी अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतली होती. ही बाब निदर्शनास येताच पती अभिषेक देवकर यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. विवाहीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात भांडे संसार, सोन्याची अंगठी दिली नाही या कारणातून वाद घालत संशयितांनी घर बांधकामासह व्यवसायासाठी हुंड्यातील एक लाख रूपये माहेरून आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.