नाशिक : औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५५ वर्षीय कामगार ठार झाला. प्रकाश दगा चौधरी (रा.बुध्दविहार जवळ,श्रमिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या कंपनी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौधरी व्हिआयपी कंपनीत नोकरीस होते. बुधवारी (दि.८) रात्रपाळीच्या सेवेसाठी ते सायकलीवर कारखान्याच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला. कार्बन कंपनीजवळील म्हसोबा मंदिर ते सुनिल ट्रान्सपोर्ट दरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने शेजारी संदिप जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.