स्लॅबचे काम सुरु असतांना तिस-या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक : हिरावाडीतील शिवकृपानगर भागात बांधकाम साईटवर स्लॅब टाकण्याचे काम करीत असतांना तिस-या मजल्यावरून पडल्याने ५८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. निवृत्ती यशवंत नागरे (रा.कडवे गल्ली,पाथर्डी गाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलगा किशोर नागरे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन ठेकेदार रमेश हरिभाऊ रांजणे (४७ रा.पपयानर्सरी,त्र्यंबकरोड) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणे यांची शिवकृपानगर येथे बांधकामाची साईट सुरू आहे. या साईटच्या तिस-या मजल्यावर शनिवारी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असतांना ही घटना घडली. नागरे हे स्लॅब ओतण्याचे काम करीत असतांना तिस-या मजल्यावरून कोसळले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ठेकेदार रांजणे यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.
हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावला
नाशिक : पारिजातनगर भागात रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व अरूण महाजन (१८ रा.वनराज रेसि.वनविहार कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महाजन सोमवारी (दि.६) सकाळच्या सुमारास पारिजातनगर सिग्नल परिसरातील भोसलाच्या बाजूने जाणा-या कॉलणीरोडने मोबाईलवर बोलत जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्या हातातील सुमारे २० हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.