शेजा-याकडून महिलेचा विनयभंग
नाशिक : पाहूण्यांनी बंगल्यासमोर वाहन पार्क केल्याने तरूणाने शेजारी महिलेस शिवीगाळ व मारहाण करीत ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील चर्च भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व अशोक भाबड (२४ रा.रंगरेज मळा) असे संशयीताचे नाव आहे. संशयीत आणि पीडित महिलेचा लागून बंगले असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. गेल्या रविवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी पाहूणे आले होते. त्यांनी संशयीताच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत आपले वाहन पार्क केल्याने ही घटना घडली. पाहूणे जाताच संशयीताने महिलेस शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. या घटनेत महिलेच्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
……
जेलरोडला दोघांची आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागात वेगवेगळया ठिकाणी राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.१४) आत्महत्या केली. त्यात एका विवाहीतेचा समावेश असून तिने विषारी औषध सेवन केले होते. तर ४२ वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. मृत दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा दोन मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. नवीन नोट प्रेस भागात राहणा-या सोनाली प्रदिप चापळकर (२४ रा. महाजन हॉस्पिटल मागे, संजय गांधी नगर) या विवाहीतेने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत. दुसरी घटना चंपानगरी भागात घडली. कुमार प्रतापराव डावरे (४२ रा.लक्ष्मीदीप हौ.सोसा.चंपानगर) यांनी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. ही बाब सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भाऊ कुणाल डावरे यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पगारे करीत आहेत.