नाशिक : वज्रेश्वरी झोपडपट्टी भागात मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला आहे. या मारहाण प्रकरणात चार जणांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू मोरे,गोपाळ जाधव,विक्की वाघ व शुभम बनकर अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल उर्फ दादू विजय थोरात (२५ रा.एरंडवाडी,पेठरोड) हा युवक रविवारी (दि.५) रात्री वज्रेश्वरी झोपडपट्टी नजीकच्या मोकळया मैदानावर गेला असता ही घटना घडली. संशयितांनी त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून, संशयित टोळके घटनेनंतर पसार झाला आहे. याप्रकरणी जखमीचा बाऊ निलेश थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचाप्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.